Last updated on June 17th, 2024 at 02:06 pm
खाप-या महाराची गोष्ट – लेखक भास्करजी भोजने सर
सर्वांना सप्रेम जयभीम ! नमोबुद्धाय !!
धम्म बंधूंनो, नुकताच माझ्या वाचनात व्हॉट्सअॅपवर एक सुंदर असा लेख आला. या लेखाचे लेखक धम्म उपासक भास्करजी भोजने सर आहेत. आंबेडकरी चळवळीसाठी त्यांनी हा लेख लिहिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार!! त्यांनी या लेखात लिहिल्यानुसार, ‘खापर्या महाराची गोष्ट’ ही बाबासाहेब आपल्या सहकार्यांना सांगत असत. या लेखावर विचार विनिमय होण्यासाठी हा लेख जसाच्या तसा देत आहे. यातील विचार हे संपूर्णपणे लेखकाचे आहेत. त्यातील मुद्द्यांवर सकारात्मक अथवा नकारात्मक निष्पक्ष चर्चा होणे आणि त्यातून आंबेडकरी चळवळ गतिमान करणे, हे या लेखाचे उद्दीष्ट आहे. लेख आवडल्यास शेअर करा. आणि बुद्धनीती.कॉम वरील येणारे नवीन लेख न चुकता तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा. 🙏🙏🙏
डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या सहकारी मित्रांना खाप-या महाराची गोष्ट सांगत असतं…. !!
खाप-या महार गावच्या पाटलाच्या घरी चाकरीला होता. पाटलाच्या बैठकीत न्याय निवाडा होत असे. पाटील चावडीचा कारभारी होता. चावडीवर दरबार भरायची वेळ आली. अशा ऐनवेळी पाटलाचं लहान पोरगं चावडीचा दरबार भरत असे, त्या खोलीत हागलं. लोकं जमलेले. पाटलाची बायको पोराचा गु काढायला चारचौघात कशी येणार? पाटलाची मोठी पंचाईत झाली. अशा अटीतटीच्या वेळी पाटलाला आपला घरगडी, खाप-या महाराची आठवण झाली. म्हणून पाटलानं खाप-या महाराला आवाज दिला आणि म्हणे, खाप-या चावडीची साफ सफाई बघ…!!
खाप-याला एवढ्या लोकांमध्ये पाटलाने आवाज दिला. माझे नाव पाटलाने घेतले, त्याचे खाप-याला मोठे अप्रुप वाटले. चारचौघात पाटलाने माझे नाव घेतले, याचा खाप-या महाराला खूप अभिमान वाटला. छाती फुगवून खाप-या पुढे सरसावला आणि खाप-या महाराने अतिशय तत्परतेने पाटलाच्या पोराचा गु हाताने उचलून फेकला. आणि घाण साफ केली…!!
दुसऱ्या दिवशी खाप-या महार गर्वाने फुगला. महारवाड्यात इकडून तिकडे छाती काढून नुसता ऐटीत फे-या मारत होता. नाकपुड्या फुगवून चाले, कुणाशीच बोलेना. जणूकाही त्याला आभाळ ठेंगणे झाले…!!
खाप-याची ही अशी अवस्था पाहून गावातील तरणीताठी पोरं, बायाबापड्या म्हणत, “आज खाप-याला काय झाले? खाप-याचा तोरा आणि रुबाब औरचं आहे”….!!
मात्र महार वाड्यातील बुजुर्ग आणि शहाणी माणसे खाप-याची ही अशी अवस्था पाहून मनातच हसत. आणि चेष्टेच्या सुरात विचारत, “खाप-या आम्ही असं ऐकलं की, काल पाटलानं भर दरबारात तुझं नांव घेतलं?” तशी खाप-याची छाती फुगत असे आणि खाप-याला आभाळ ठेंगणं वाटे…!!
खाप-या मोठ्या आनंदाने गर्वाने आणि मोठेपणाचा आव आणून, भेटेल त्याला छाती फुगवून सांगे, “पाटलाने भर दरबारात माझे नाव घेऊन मला हाक मारली”…!!
पाटलाने भर दरबारात नाव घेतल्याचा आनंद आणि मोठेपणा, त्यामुळे झालेला गर्व ही एक वृत्ती आहे…!! ही लाचार आणि भिकारचोट वृत्ती पिढ्यानपिढ्या चालत आहे. ती निढंग्या लोकांच्या मनाची अवस्था आहे…!!
खाप-या महार आजही जीवंत आहे. काल तो पाटलाच्या वाड्यात घरगडी होता. आज तो साफसुतरे कपडे घालून शाळा, कॉलेजात, सहकारी बँक, सुत गिरणी, साखर कारखान्यात आहे, तो राजकीय पक्षात आहे. कधी पुस्तक लिहीतो तर कधी साहित्यिक होतो, पाटलाच्या पुण्याईने त्याला संकुचित जग ‘अर्थतज्ञ’ म्हणते. झाडावर चढवण्यासाठी त्याला विचारवंत केले जाते….!!
काल ‘खाप-या महार’, पाटलानं नुसतं नाव घेतलं, तरी पाटलाच्या पोराचा हाताने गु काढायला तयार होता. आता त्याला कमिटीच्या बोर्डावर, पुरस्काराच्या पुंगळीवर नाव आलं की, तो हाताने गु काढायला तयार आहे…!
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना, पाटलाच्या पोराचा हाताने गु काढणारा खाप-या महार लाचार आणि परिस्थितीने गांजलेला आहे, आणि अज्ञानापोटी तो गर्वाने फुगतो असे वाटले. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर कष्ट सोसून, पोटची पोरं मातीत गाळून परिस्थिती निर्माण केली आणि शिका म्हणून संदेश दिला….!!
काळ बदलला, पुस्तक वाचली, हातात डिग्री आली. तरीही खाप-याच्या वृत्तीत बदल झाला नाही, ही आंबेडकरी चळवळीसाठी आणि आंबेडकरवादी समूहासाठी मोठी खेदाची बाब आहे…!!
खाप-या महाराची गोष्ट सांगण्याच्या पाठीमागे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा हेतू होता. ते मानववंशशास्त्रज्ञ होते, त्यांना आपल्या पुढच्या पिढीचा इतिहास बदलवायचा होता, समाजाच्या मनावर प्रक्रिया करायची होती, लाचारी हाकलून देऊन स्वाभिमान मना मनात पेरायचा होता. म्हणून ते खाप-या महाराची गोष्ट सांगत असत…!! आता यापुढे खाप-या जीवंत राहण्यात अर्थ नाही…!!
सत्ताधारी जमात बनायचे असेल तर खाप-या महाराची तिरडी उचलून स्मशानात दफन करावी लागेल, ही अट आहे…!!
आंबेडकरवादी समूहाने अतिशय गांभीर्याने यावर लक्ष घातले पाहिजे. लढाई मोठी अटीतटीची आणि निकराची आहे….!!
जयभीम !!
– लेखक भास्करजी भोजने सर